कृषी समृद्धी कर्ज योजना

  • homeकृषी समृद्धी कर्ज योजना

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) वतीने आयोजित 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' शुभारंभ सोहळा, भव्य शेतकरी मेळावा आणि आदर्श शेतकरी सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तामामा भरणे, सहकारमंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, बँकेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सुलभ व परवडणाऱ्या कर्ज सुविधांचा लाभ मिळून कृषी उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमादरम्यान नाविन्यपूर्ण शेती पद्धती अवलंबून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करून इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. सहकार चळवळ आणि कृषी क्षेत्राच्या विकासात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहकार, शेती आणि ग्रामीण विकास यांचा परस्पर संबंध स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन आणि सहकारी संस्थांची भूमिका अधोरेखित केली. "शेतकरी सक्षम तर महाराष्ट्र सक्षम" हा विचार केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.